अमेरिकेन संघातल्या 'भारतीयांनी' सुपर ओव्हरमध्ये खेळ उलथवत केला पाकिस्तानचा पराभव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषक २०२४ सुरू होऊन अवघे चार दिवस झाले आहेत आणि त्यात दुसर्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. ही स्पर्धा किती चुरशीची होणार आहे हेच यानिमित्ताने क्रिकेट रसिकांना दिसून येत आहे. स्पर्धेतील पहिला मोठा धक्कादायक निकाल अमेरिकेने लावला आहे. त्यांनी अ गटातील सामन्यात २००९च्या चॅम्पियन पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. टेक्सासमधील डलास येथील ग्रँड प्रायरी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत सात गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेच्या संघाला २० षटकांत तीन गडी गमावून १५९ धावा करता आल्या. कर्णधार मोनांक पटेलने सर्वाधिक ५० धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेने १८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ सहा चेंडूत केवळ १३ धावा करू शकला. मोनांकला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. २०२४च्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि त्यातच त्यांना त्यांच्यापेक्षा खूपच कमकुवत असलेल्या अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह अमेरिकेचा संघ अ गटात दोन विजय आणि चार गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारत एका सामन्यानंतर दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना ९ जून रोजी भारताविरुद्ध आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा संघ आता १२ जूनला भारताशी भिडणार आहे.
अमेरिकेच्या विजयात कर्णधार मोनांक पटेल आणि सौरभ नेत्रावळकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. अमेरिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोनांकने ५० धावांची खेळी केली. त्याचवेळी सौरभने सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत १९ धावा होऊ दिल्या नाहीत. डावखुरा मध्यमगती गोलंदाज सौरभचा जन्म १९९१ मध्ये मुंबईत झाला. २००८-०९ कूचबिहार चषकामध्ये त्याने सहा सामन्यांत ३० बळी घेतले होते. त्यानंतर २०१०च्या अंडर-१९ विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
यानंतर, न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१० अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासह सौरभ टीम इंडियाचा भाग होता. उर्वरित तीन खेळाडूंनी सिनियर टीम इंडियामध्ये स्थान मिळवले, पण सौरभला मुकावे लागले. यानंतर तो रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धाही खेळला. तथापि, काहीतरी चांगले शोधण्यासाठी, तो अमेरिकेत गेला आणि तेव्हापासून तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. तो अमेरिकन संघाचा कर्णधारही राहिला आहे.
तर मोनांकचा जन्म १९९३ मध्ये गुजरातमधील आनंद येथे झाला. या यष्टीरक्षक फलंदाजाने २०१८ मध्ये अमेरिकेकडून खेळण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून तो त्याच संघाकडून खेळत आहे. मोनांकने अंडर-१६ आणि अंडर-१८ क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व केले आहे. मोनांकला २०१० मध्ये ग्रीन कार्ड मिळाले आणि २०१६मध्ये तो कायमचा अमेरिकेत गेला. तो २०१८ पासून अमेरिकेकडून खेळत आहे. सौरभ आणि मोनांक यांच्याशिवाय हरमीत सिंग देखील या संघाचा एक भाग आहे. २०१२ मध्ये, हरमीतने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक खेळला आणि भारताला विजेतेपद मिळवून दिले.
सुपरओव्हरमध्ये ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंग अमेरिकेसाठी फलंदाजीला आले. त्याचवेळी मोहम्मद आमिर पाकिस्तानसाठी गोलंदाजी करायला आला. जोन्सने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर जोन्सने यॉर्करवर धाव घेतली. पुढचा चेंडू वाईड होता आणि त्यावर एक धावही घेतली गेली. म्हणजे दोन धावा आल्या. चौथ्या चेंडूवर एक धाव आली. पुढचा चेंडू पुन्हा वाईड झाला. यावर अमेरिकेच्या फलंदाजांनी एक धाव घेत दोन धावा केल्या. जोन्सने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पुढचा चेंडू पुन्हा वाईड झाला. यावर अमेरिकेच्या फलंदाजांनी पुन्हा एक धाव घेतली. त्यानंतर अमेरिकन खेळाडूंनी दुसरी धाव घेतली म्हणजे चेंडूशिवाय तीन धावा झाल्या. अमेरिकेच्या खेळाडूंनी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि जोन्स धावबाद झाला. अशाप्रकारे सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने एकूण १८ धावा केल्या. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी १९ धावांची गरज होती.
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि फखर जमान फलंदाजीला आले. त्याचवेळी सौरभ नेत्रावळकर अमेरिकेसाठी गोलंदाजी करायला आला. पहिल्याच चेंडूवर इफ्तिखारला एकही धाव घेता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखारने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर सौरभने इफ्तिखारला मिलिंद करवी झेलबाद केले. पाकिस्तानला तीन चेंडूत १४ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शादाबच्या पायाला चेंडू लागला आणि चौकार गेला. पाचव्या चेंडूवर दोन धावा झाल्या. शेवटच्या चेंडूवर शादाबला एकच धाव करता आली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेच्या १८ धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानला केवळ १३ धावा करता आल्या.
तत्पूर्वी, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २०-२० षटकांनंतर बरोबरीत सुटला होता. एकेकाळी अमेरिकन संघ धावांचा पाठलाग करताना पुढे होता आणि संघ सहज जिंकेल असे वाटत होते. १६ षटकांत अमेरिकेने ३ गडी गमावून १२६ धावा केल्या होत्या आणि २४ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या. इथून पाकिस्तानी गोलंदाजांनी सामना फिरवला. पुढच्या तीन षटकात १९ धावा आल्या. २० व्या षटकात अमेरिकेला विजयासाठी १५ धावांची गरज होती. हारिस रौफ गोलंदाजी करत होता. आरोन जोन्स आणि नितीश कुमार स्ट्राईकवर होते. नितीशने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर जोन्सने दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवरही एक धाव आली. ॲरॉन जोन्सने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून अमेरिकेला सामन्यात परत आणले. यानंतर जोन्सने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. अशाप्रकारे अमेरिकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. नितीशने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना बरोबरीत आणला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. संघाने २६ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. मोहम्मद रिझवान नऊ धावा केल्यानंतर, उस्मान खान तीन धावा करून आणि फखर जमान ११ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार बाबरने शादाबसोबत ७२ धावांची भागीदारी केली. शादाब २५ चेंडूत १ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० धावा करून बाद झाला. आझम खान पुन्हा फ्लॉप झाला आणि गोल्डन डकचा बळी ठरला. पहिल्याच चेंडूवर तो केन्झिगेचा बळी ठरला. बाबर ४३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याचवेळी इफ्तिखार अहमद १४ चेंडूत १८ धावा करून तंबूमध्ये परतला. शाहीनने १६ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २३ धावांची नाबाद खेळी खेळली. तर हरिस रौफ तीन धावा करून नाबाद राहिला. अमेरिकेकडून नौस्तुश केंझिगेने तीन बळी घेतले. तर सौरभ नेत्रावळकरने दोन गडी बाद केले. अली खान आणि जसदीप सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात अमेरिकेची सुरुवात स्थिर होती. स्टीव्हन टेलर आणि कर्णधार मोनांक पटेल यांनी ३६ धावांची भागीदारी केली. टेलर १२ धावा करून नसीम शाहचा बळी ठरला. यानंतर मोनांकने अँड्रिस गॉससोबत दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. गॉस २६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा करून बाद झाला. मोनांकने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर षटकार खेचून आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, यानंतर तो तंबूमध्ये परतला. त्याने ३८ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. अखेरीस, ॲरॉन जोन्स २६ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावा तर नितीश कुमार १४ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर, नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
उद्या सकाळी नामिबीया विरुद्ध स्कॉटलंड आणि रात्री ८ वाजता कॅनडा विरुद्ध आयर्लंड सामना होणार आहे
No comments:
Post a Comment